पीओकेमध्ये पाकविरोधी सूर

अलिकडेच पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये पाकिस्तानपासून मुक्ती मिळवण्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. हे आंदोलन जेकेएलएफचे अध्यक्ष मोहंमद सगीर याच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते. या सर्वच आंदोलकांनी पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मागितले आहे. यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 काढल्यानंतर पाकिस्तानच्याच अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्येही पाकिस्तानविरोधात सूर उमटले जात आहेत. परिणामी तेथील नागरिकांची गळचेपी करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि सैनिकांकडून अत्याचार केले जात आहेत. त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटत आहेत. कालांतराने व्याप्त काश्‍मीरमधील नागरिक या अत्याचाराविरोधात जेव्हा रस्त्यावर उतरतील तेव्हा आंतरराष्ट्रीय संघटनेला हस्तक्षेप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. प्रसंगी ही संघटना पाकिस्तानला अत्याचार थांबविण्यासाठी समजही देईल.

अलिकडेच पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये पाकिस्तानपासून मुक्ती मिळवण्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. हे आंदोलन जेकेएलएफचे अध्यक्ष मोहंमद सगीर याच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते. या सर्वच आंदोलकांनी पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मागितले आहे. यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध जो अपप्रचार सुरू केला आहे, तो या आंदोलनामुळे अंगलट येऊ शकतो, या भीतीने पाकिस्तानची गाळण उडाली आहे. परिणामी या आधारावर आंतरराष्ट्रीय संघटना पाकिस्तानच्या मुसक्‍या बांधू शकतात. म्हणूनच पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमधील आंदोलन दडपण्यासाठी पाकिस्तान क्‍लृप्त्या लढवत आहे. सर्वात अगोदर म्हणजे इस्लाम धर्माचा संदर्भ देऊन भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सैनिक आणि पोलिसांकडून अत्याचार सुरू केले. सुमारे 40 जणांना अटक करुन तुरुंगात टाकण्यात आले. एवढेच नाही तर आंदोलकांच्या नातेवाईकांचाही छळ सुरू केला आहे.

पाकिस्तानने लोकशाही मार्गाचा कधीही अवलंब केला नाही. तेथे नेहमीच हुकुमशाही राज्य करते. त्यामुळे पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्याप्त काश्‍मीरवरील जनतेवर दडपशाहीचे तंत्र अवलंबत आहे. पाकिस्तानने भारताचा मोठा भाग बळकावला आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र व्याप्त काश्‍मीरमधील जनेतला स्वातंत्र्याचा उपभोग कधीही घेता आला नाही. पाकव्याप्त काश्‍मीरमधील जनता ही पाकिस्तानची गुलाम म्हणून जीवन जगत आली आहे. भेदभावाचे बळी पडलेल्या या नागरिकांच्या स्रोतांचा उपयोग हा पाकिस्तानच्या फायद्यासाठीच केला गेला आहे. त्याचा लाभ स्थानिकांना कधीही मिळाला नाही.

पाकव्याप्त काश्‍मीरचा उपयोग केवळ भारताविरोधात कुरापती करण्यासाठीच केला गेला आहे. पाकिस्तानने भारताचा भूभाग कसा बळकावला, त्याचा इतिहास संपूर्ण जगाला ठाऊक आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी वेशभूषा बदलून हल्ला केला आणि भारताचा मोठा भाग हिसकावून घेतला. भारतीय लष्कराने धाडसी कारवाई करत पाकिस्तानला मागे रेटले, मात्र भारतीय जवानांचे हात बांधले गेले. परिणामी काश्‍मीरचा मोठा भाग हा पाकिस्तानकडेच राहिला. पाकिस्तानने व्याप्त काश्‍मीरमधील काही भाग चीनला दिला. ही कृती स्थानिक नागरिकावरचा मोठा अन्याय ठरली आहे. पाकव्याप्त काश्‍मीरवरुन चीन कशा कुरापती करतो हे जगजाहीर आहे. एवढेच नाही तर व्याप्त काश्‍मीरमध्ये नागरिकांच्या भावना आणि हक्कांची सतत पायमल्ली होते. तेथील जनतेला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही. नैसर्गिक संपदा भरपूर असूनही त्याचा वापर केवळ दहशतवादी छावण्यासाठीच केला जातो.

विशेष म्हणजे चीनचे अनेक सैनिक तळ पाकव्याप्त काश्‍मीरमध्येच आहेत. या ठिकाणावरून भारताला आव्हान देणे सोपे जाते. तसेच कुरापतीही केल्या जातात. भारताविरुद्ध चीन आणि पाकिस्तान या भूमीचा वापर कसा करतात हे सर्वांनाच माहीत आहे. अशा स्थितीत कलम 370 काढल्यानंतर पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली आहे. पाकिस्तानच्या भूमिकेला कोणत्याच व्यासपीठावर स्थान मिळालेले नाही. असे असले तरी चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. एवढेच नाही तर हा मुद्दा संयुक्त राष्ट्रातही मांडला गेला, मात्र तेथेही भारताच्या कुटनितीपुढे पाकिस्तानची डाळ शिजली नाही. व्याप्त काश्‍मीरमध्ये पाकिस्तान आणि चीन यांची आघाडी ही भारताच्या सुरक्षेला आव्हान देत आहे. या भागात दहशतवादी संघटनांचे मोठे जाळे आहे. या शिबिरांमुळेच तेथे शिक्षण आणि विकासाला चालना मिळत नाही. दहशतवाद्यांना केवळ इस्लामवर आधारित व्यवस्था हवी आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदुंवरही अत्याचार केले जात आहेत. खुद्द इम्रान खान यांच्या पक्षातील एक माजी आमदार बलदेव कुमार यांनी भारतात आश्रय मागितला आहे. ते सध्या भारतात असून त्यांनी परत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक शिख कुटुंब भारतात येण्यासाठी तयार असल्याचे बलदेव कुमार यांनी सांगितले. एवढेच नाही तर मुस्लिम समाजदेखील पाकिस्तानात सुरक्षित नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

गेल्या पाच ते सहा दशकांपासून पाकिस्तानने भारताविरोधात असंख्य कुरापती केल्या. तीन युद्धेही लढली आणि तिन्ही वेळेस भारताकडून मार खाल्ला आहे. दहशतवाद्यांच्या मदतीने भारतात घातपाती कारवाया घडवून आणणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे. भारत आता पाकिस्तानविरुद्ध आक्रमक कुटनिती आखत आहे. बलुचिस्तान येथे अस्मिता आणि स्वातंत्र्याचा मुद्दा भारताने जगासमोर आणला आहे. आता पाकव्याप्त काश्‍मीरवरूनही भारताला आक्रमक धोरण अवलंबावे लागेल. व्याप्त काश्‍मीरमधील पाकिस्तानचे कारनामे जेव्हा कळतील तेव्हा पाकिस्तान दहशतवादाला कशा रितीने पोसतो, हे कळून चुकेल. पाकिस्तानकडून मानवतेची हत्या केली जात आहे. हा चेहरा समोर येणे काळाची गरज आहे.

व्ही. के. कौर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here