लंडन, दि. 21- लंडनमध्ये करोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या 36 जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. अशाच प्रकारे लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या काही जणांना लंडन पोलिसांनी अलिकडच्या काळात अटक केली आहे. अटक झालेल्या बहुतेकांना करोना साथीला रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
शनिवारी लॉकडाऊनच्या विरोधासाठी दुपारच्या वेळेस हैदर पार्क परिसरामध्ये हजारो निदर्शक जमा झाले होते. थोड्याच वेळात या जमावाचे रुपांतर मोर्च्यामध्ये झाले आणि मध्य लंडन परिसरात हा मोर्चा निघाला. काही निदर्शक हैदर पार्क परिसरात परत आले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले, असे लंडनच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले.
ब्रिटनमध्ये करोनाची साथ वेगाने वाढायला लागल्यावर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जानेवारी महिन्यापासून नव्याने निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर बाधितांची संख्या कमी होत असल्याची लक्षणे दिसायला लागल्यावर बोरिस जॉन्सन यांनी गेल्या महिन्यात अंशतः निर्बंध शिथील केले आहेत. मात्र त्या काळातही लॉकडाऊनविरोधी निदर्शने सुरूच होती. शनिवरी झालेल्या निदर्शनांना लॉकडाऊनचा विरोध या कारणाव्यतिरिक्त एका महिलेची हत्या हे तत्कालिक कारण देखील होते.