दुबई – इराणमध्ये सध्या हिजाबविरोधी निदर्शने करण्यात येत आहेत. यामुळे निदर्शकांच्या सुरक्षा दलांशी चकमकी होत असल्याने ठिकठिकाणी आंदोलनात हिंसक घटना घडत आहे. यात 60 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, सरकारकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.
पोलिसांच्या अटकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याने महिलांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्यास सुरुवात केली. इराणमध्ये हिजाब न घातल्याने एका महिलेला अटक करण्यात आली होती. त्या महिलेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांच्या अटकेत असताना महसा अमिनीचा मृत्यू झाला. यानंतर इराणमधील महिलांनी आंदोलने करण्यास सुरुवात केली.
इराणमध्ये ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. महिलांकडून केस कापून आणि हिजाब जाळून निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रपती इब्राहीम रईसी यांनी महसा अमिनी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तर इराणमध्ये सुरु असलेल्या हिजाब विरोधी निदर्शनाला इराणच्या विरोधकांचा कट असल्याचे म्हटले आहे.