पाटबंधारे विभागाची अतिक्रमणविरोधी कारवाई

येरवडा – पाटबंधारे विभागाच्या शासकीय वसाहतीमधील जागेवर गेल्या 25 वर्षांपासून अतिक्रमण केलेल्या टपऱ्यांवर पाटबंधारे विभागाने धडक कारवाई केली. महापालिका अतिक्रमण विभाग आणि येरवडा पोलीस विभागाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

पाटबंधारे विभागाच्या अनेक जागांवर अतिक्रमण झाले असून दांडेकर पूल येथील कालवाफुटीला जवळपासच्या झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण कारणीभूत होते. अतिक्रमणामुळे शासकीय मालमत्तेचा गैरवापर आणि नुकसान होत असल्याने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार अतिक्रमण झालेल्या जागांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. वेळोवेळी नोटीस देऊनही ही दुकाने हलविली जात नव्हती. फेब्रुवारी 2019 ला शेवटची नोटीस देऊन मे मध्ये महिनाभर दुकाने बंद ठेवून अतिक्रमण काढण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यास प्रतिसाद न आल्याने 14 जून रोजी ही कारवाई करण्यात येणार होती. मात्र, तांत्रिक कारणाने ही कारवाई होऊ शकली नाही, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे मालमत्ता व्यवसथापन उपविभागाचे शाखा अधिकारी बनसोडे यांनी सांगितले. मालमत्ता व्यवस्थापन उपविभाग कार्यालयाचे सहायक अभियंता ए. एस. नवलगुलवार शाखाधिकारी व्ही. बनसोडे, श्रेया पाटील, अंजुम पठाण तसेच पोलीस व अतिक्रमणविभागाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.