पुणे – ड्रोनच्या सहाय्याने परदेशातील तेल विहिरींवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोनचा वापर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ड्रोनच्या सहाय्याने संवेदनशील परिसराची टेहाळणी तसेच छायाचित्रे काढली जाऊ शकतात.
पुणे शहरात लष्कराची महत्त्वाची केंद्रे तसेच प्रशिक्षण संस्था आहेत. तसेच, अनेक संवेदनशील आस्थापना आहेत. या पार्श्वभूमीवर ड्रोनच्या वापरावर पुणे पोलिसांकडू वेळोवेळी नोटिफिकेशन काढून ड्रोनच्या वापरावर बंदी घातली जाते. तर काही बाबतीत महत्त्वाच्या परवानग्या घेत मर्यादीत वापरासाठी परवानगी दिली जाते. लग्न समारंभासाठीही ड्रोनच्या वापरावर परवानगी आवश्यक असते. ही बाब लक्षात घेता पुणे पोलिसांत ऍन्टी ड्रोन यंत्रणा लवकरच दाखल होणार आहे. यासंदर्भातील सर्व सोपस्कर पार पाडले असून पुढील काही दिवसांत ही यंत्रणा दाखल होईल. या यंत्रणेमुळे परवानगी न घेता ड्रोनचा वापर केल्यास किंवा संवेदनशील परिसरात ड्रोनचा वापर होताना दिसताच हा ड्रोन ब्लॉक करता येणार आहे.