हैदराबाद – देशातील अन्य राज्यांप्रमाणेच तेलंगणा राज्यातही सीएए कायद्याच्या विरोधात प्रस्ताव संमत केला जाणार आहे. आज मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सीएए विरोधातील प्रस्ताव संमत केला गेला. केंद्र सरकारने हा कायदा मागे घ्यावा अशी केंद्र सरकारला विनंतीही या निमीत्ताने करण्यात आली आहे.
सीएए विरोधातील प्रस्ताव विधानसभेच्या येत्या अधिवेशनात मांडला जाणार आहे. केंद्र सरकारने नागरीकत्व देताना धर्माच्या आधारावर भेदभाव करू नये अशी मागणीही तेलंगणा सरकारने केली आहे. सीएए कायद्यामुळे देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला बाधा येत असल्याचेही तेलंगणा सरकारच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या आधी केरळ, पंजाब, राजस्तान आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या विधानसभांमध्येही सीएए विरोधातील प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.