ग्वालियर – काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे मध्यप्रदेशात काँग्रेसला सत्ता गमवावी लागली होती. राज्यात आता शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार असून ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले आहे.
अशातच आज सकाळी ११ च्या सुमारास शिंदे यांच्या इंस्टाग्राम खात्यावर त्यांनी भाजपविरोधात दिलेले एक जुने भाषण पोस्ट करण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला होता. मात्र काही वेळानंतर शिंदे यांचे इंस्टाग्राम खाते ‘हॅक’ झाले असल्याची माहिती समोर आली.
शिंदे काँग्रेसमध्ये असताना त्यांचा पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यासोबत टोकाचा वाद असल्याच्या बातम्या अनेकदा माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. आज ज्योतिरादित्य शिंदे सिंह यांच्या राघोगड भागात दौऱ्यावर असतानाच त्यांचे इंस्टाग्राम खाते हॅक झाले. या हॅकरने शिंदे यांच्या खात्याचे नाव बदलून श्रेया अरोरा असे केले होते. तसेच या खात्यावर त्यांचा भाजपविरोधात भाषण देतानाच एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. शिंदे यांच्यासोबत यापूर्वी देखील असे झाले आहे.
शिंदे यांनी मार्च २०२० मध्ये भाजपत प्रवेश केला. तसेच त्यांना २०२१ च्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारावेळी केंद्रीय मंत्रीही करण्यात आले. तेव्हाही त्यांचे फेसबूक अकाउंट हॅक करण्यात आले होते. त्या वेळीही त्यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता.
गेल्यावर्षी ते जेव्हा राज्यसभेवर निवडून गेले, तेव्हाही त्यांचे फेसबूक अकाऊंट हॅक झाले होते. या व्हिडिओत शिंदे भाजप सरकारच्या अपयशावर भाष्य करताना दिसत होते.