बुद्धांच्या तत्त्वज्ञानात जगाच्या समस्यांचे उत्तर, धम्मचक्र दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांचे प्रतिपादन

 

नवी दिल्ली – भगवान गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानात जगाच्या समस्यांची सारी उत्तरे सामावलेली आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज सारनाथ येथील धम्मचक्र दिनाच्या कार्यक्रमाला व्हिडीओद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, बुद्धांनी सारनाथ येथील आपल्या पहिल्या प्रवचनात अनेक महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे. मानवाला दु:खमुक्‍त करण्याची शिकवण त्यांच्या तत्वज्ञानात होती, असे ते म्हणाले. आपल्यालाही या तत्त्वांचे आचरण करून लोकांच्या आशा जागृत ठेवण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

ते म्हणाले की, भारताने सुरू केलेले स्टार्ट अप सेक्‍टर हे करुणा, आशा आणि नावीन्याचा आधार घेऊन लोकांची दु:ख आपण कशी दूर करू शकतो याचे एक उत्तम उदाहरण आहे. या स्टार्टअप्‌सद्वारे बुद्धिवान युवा पिढी जागतिक समस्यांवर उत्तरे शोधत आहे. भारत हा सर्वात मोठ्या स्टार्टअपची भूमी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

बुद्धांच्या आठ सूत्री मार्गाचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, त्यातून अनेक देशांचे आणि समाजाचे कल्याण साधता येऊ शकते. त्यात त्यांनी दया आणि करुणेला मोठे महत्त्व दिले आहे. विचार आणि कृतीतून साधेपणा साधायची शिकवण बुद्धांनी आपल्याला दिली आहे असे ते म्हणाले. आज जगापुढे अनेक भीषण समस्या उभ्या आहेत. या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी आपल्या बुद्धांच्याच शिकवणुकीकडे जावे लागेल. बुद्धांची शिकवणूक आजही उपयुक्‍त असून ती भविष्यातही उयुक्‍तच राहील, असे पंतप्रधान म्हणाले. या 21 व्या शतकाविषयी मी खूप आशावादी आहे असे नमूद करून मोदी म्हणाले की, हा आशावाद मला आजच्या नव्या पिढीत दिसतो आहे. ही पिढी बुद्धांच्या शिकवणुकीशीच जोडली गेलेली आहे. त्यातूनच ते योग्य मार्ग शोधतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. बुद्धांचे विचार आपल्याला शांत करतात आणि त्याच वेळी ते आपल्याला आनंदीतही करतात. आपणच आपले मार्गदर्शक बनले पाहिजे, ही त्यांची शिकवण म्हणजे उत्तम व्यवस्थापनाचाच धडा आहे, असेही ते म्हणाले. भारतात बुद्धांशी संबंधित अनेक तीर्थस्थाने असून ती अधिकाधिक लोकांशी जोडण्याची गरजही मोदींनी यावेळी व्यक्‍त केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.