सातारा – कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेल्या करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातीलत ४३ वर्षीय महिलेचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ही महिला करोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. काल मरण पावलेल्या पाच महिन्यांच्या बाळाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
आता सातारा जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १९ झाली आहे. त्यापैकी ३ बाधित रुग्ण (कोविड १९) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत. तर २ जणांचा मृत्यू झाला आहे.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ५, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील २७, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील ४, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील ८ व फलटण येथील ११ असे एकूण ५५ रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. कृष्णा मेडिकल कॉलेजमधील मृत झालेल्या ५ महिन्याच्या बालकाचा अहवाल निगेटिव्ह असल्याचेही कळविण्यात आले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेजमधील बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील १३ वर्षीय मुलाचा अहवाल अनिर्णित असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यलयाने कळविले आहे.
दि. 22 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात बाधीत रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून १० जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.