पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 55 वर्षीय रुग्णाचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आले. यापूर्वी बारामतीचे चौघे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज आणखी एक जण करोनामुक्त झाल्याने आत्तापर्यंत पाच जण करोनामुक्त झाले आहेत.
करोनामुक्त झालेल्या रुग्णाला डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून निरोप दिला. करोनामुक्त होऊन घरी परतलेला हा रुग्ण खडकी कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील आहे. संबंधित व्यक्तीला 15 दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसामध्ये न्युमोनिया झाला होता. करोना चाचणी घेतल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. किरण खलाटे, डॉ. शर्मिला गायकवाड यांनी उपचार केले. 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 3 तारखेला त्यांची पहिली चाचणी घेतली असता त्यामध्ये त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. पुन्हा 4 तारखेला दुसऱ्या चाचणीतही अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात आणखी एक दिवस ठेवून आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष देशपांडे यांनी दिली.
रूग्णालयामध्ये सध्या 19 करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 4 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, 6 संशयित रुग्णांचा चाचणी अहवाल तपासणीसाठी पाठविलेला आहे.