पब्जी गेमचा आणखी एक बळी

अन्न-पाण्याचा त्याग केल्याने 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

हैदराबाद : पब्जी गेम अनेकांच्या आयुष्यासाठी घातक ठरतोय. त्याची अनेक उदाहरणेदखील दिवसेंदिवस समोर येत आहेत. पंजाबमध्ये या गेमच्या नादात आई-वडिलांचे 16 लाख रुपये उडवल्याची घटना ताजी असतानाच आता एका धक्‍कादायक घटना घडली आहे. या गेममुळे एका 16 वर्षाच्या मुलाने आपला जीव गमावला असल्याचे सांगण्यात येत आहे. आंध्रप्रदेशमधील या मुलाने पब्जीच्या नादात अन्न पाण्याचा त्याग केला आणि यातून वाढलेल्या आजाराने त्या मुलाचा बळी गेला असल्याचे म्हटले जात आहे.

एका वृत्तपत्राने याविषयी माहिती दिली आहे. मृत मुलगा लॉकडाऊनमुळे मागील अनेक महिन्यांपासून घरीच होता. या काळात त्याला या गेमचे व्यसन लागले. तो पब्जी गेम खेळू लागल्यानंतर तर त्याने गेमसाठी अन्न पाण्याचाही त्याग केला. गेम खेळण्याच्या नादात तो अनेक दिवस जेवायचाही नाही. अशाने या मुलाची प्रकृती बिघडली. त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आणि त्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला इलूरूमधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण सतत कमी होत गेल्याने त्याची प्रकृती आणखी खालावली आणि उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला.

याआधी पुण्यात देखील अशी घटना घडली होती. हर्शल मेमाने नावाच्या युवकाचा गेम खेळताना ब्रेन स्ट्रोक आला होता. भिवंडीत पब्जी खेळण्यास मनाई केल्याने अल्पवयीन मुलाकडून मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडली होती. तर भिवंडीतील मानसरोवर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाने पब्जीच्या नादापायी घर सोडून निघून गेल्याचा प्रकार घडला होता. पंजाबमधील एका 17 वर्षीय मुलाने पब्जीसाठी आपल्या आई-वडिलांच्या खात्यातील तब्बल 16 लाख रुपये खर्च केल्याचीही घटना घडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.