शिक्रापूर (प्रतिनिधी) : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना आता शिक्रापुरातील एका कोरोना बाधित जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे व तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना एका युवकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना २७ एप्रिल २०२० रोजी घडली होती. त्यांनतर अनेक रुग्ण आढळून येत काही रुग्ण पूर्णपणे बरे देखील झाले आहेत, तर दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना शिक्रापूर येथील बुधे वस्ती येथे राहणाऱ्या ७९ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा अपघात झाल्याने त्याचेवर तळेगाव ढमढेरे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना तेथील डॉक्टरांनी सदर जेष्ठ नागरिकाची कोरोना तपासणी केली असता त्या इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे २५ जुलै रोजी समोर आले होते. त्यांनतर सदर इसमाला उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
त्यांनतर आरोग्य विभागाच्या वतीने खबरदारी म्हणून तो रूग्ण राहत असलेल्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. तसेच घरातील व्यक्तींची देखील तपासणी करण्यात आली होती आणि सदर रुग्णावर पुणे येथे उपचार सुरु असताना आता त्या इसमाचा मृत्यू झाला असल्याने शिक्रापूर गावामध्ये कोरोनाचा दुसरा बळी ठरला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.