करोनाच्या आणखी एका प्रकराने ब्रिटनमध्ये हाहाकार

दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या व्यक्तींमार्फत विषाणूचा देशात प्रवेश

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण जगावर अगोदरच एक संकट आले असताना आता याच विषाणुच्या नव्या प्रकारामुळे ब्रिटनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पहिल्या कोरोना विषाणूच्या आघातातून जग सावरत नाही तोच काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत ब्रिटनने साऱ्या जगाला सावध केले होते. मात्र आता कोरोनाच्या आणखी एका प्रकारामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दक्षिण आफ्रिकेहून परतलेल्या दोन व्यक्तींमार्फत विषाणुचा हा प्रकार ब्रिटनमध्ये आल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री हॅंकॉक यांनी यासंदर्भातील माहिती दिली. या विषाणूचा नवा प्रकार अधिक वेगाने संसर्ग पसरवत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य विभागाने येत्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गात वाढ होण्यास विषाणूचा हाच प्रकार कारणीभूत ठरु शकतो असे सूचक वक्तव्य केले होते.

ब्रिटनमध्ये सध्याच्या घडीला दोन नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूची दहशत पाहायला मिळत आहे. ज्या पार्श्वभूमीवर 10 डाऊनिंग स्ट्रीटला संबोधित करतेवेळी हॅंकॉक म्हणाले, कोरोनाचे हे दोन्ही नवे प्रकार अशा व्यक्तींमध्ये आढळून आले आहेत, जे मागील काही दिवसांत दक्षिण आफ्रिकेहून परतले आहेत. कोरोनाचे हे नवे रुप चिंता वाढवणारे असून, त्यामुळे संसर्ग झपाट्याने वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, ब्रिटनवर असणाऱ्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या सर्व उड्डाणांवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय सध्याच्या घडीला जे दक्षिण आफ्रिकेमघ्ये आहेत किंवा दक्षिण आफ्रिकेतील कोणाच्याही संपर्कात मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत आले आहेत त्यांनी विलगीकरणाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.