पिंपरी -एसटीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येत असून कार्ड काढण्यासाठी पुन्हा दोन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. सवलत धारकांना 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी कार्ड संबंधित सलवतधारकांना मिळते, असे वल्लभनगर आगारातून सांगण्यात आले.
एसटीच्या प्रवासात विविध घटकांतील सवलत धारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे. स्मार्ट कार्ड असेल तर, त्यानुसार भाड्यात सवलत दिली जाते. या पूर्वीही स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. मात्र, अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव तसेच पुढे दसरा, दिवाळीत ज्येष्ठ नागरिक व इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्मार्ट कार्ड योजनेच्या नोंदणीसाठी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून विविध घटकांना प्रवास भाड्यात 25 टक्क्यांपासून पुढे सवलत दिली जात आहे. त्यासाठी लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेलेस्मार्ट कार्डकाढणे आवश्यक आहे. या पूर्वी या योजनेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता गणेशोत्सव, दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व विभागांना सूचना देण्यात
आल्या आहेत.