वॉशिंग्टन- अमेरिकेचे नवीन अध्यक्ष जो बायडेन यांनी पूर्वाश्रमीचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक महत्वाचे निर्णय बदलण्याचा धडाका लावला आहे. आता बायडेन यांनी संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेमध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याचे सूतोवाच केले आहे. ट्रम्प यांनी तीन वर्षांपूर्वी या महत्वाच्या परिषदेतून अमेरिकेने माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. मानवी हक्क परिषदेच्या माध्यमातून काही बहुस्तरिय संघटना आणि करारांमधूनही अमेरिकेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता बायडेन हा निर्णय बदलणार आहेत.
संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेच्या निवडणूकीतून पूर्ण सदस्यत्व निरीक्षक म्हणून सहभागी होणे गरजेचे आहे. त्यामुळे या परिषदेत अमेरिका लवकरच पुन्हा सहभागी होणार असल्याची घोषणा अमेरिकेचे नवीन परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकन आणि परिषदेतील उच्चपदस्थ अधिकारी याबाबतची घोषणा करणार आहेत, असे बायडेन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमेरिकेतील अनेक पुराणमतवादी खासदार आणि इस्रायल समर्थक गटांकडून बायडेन यांच्या या निर्णयावर टीका होण्याची शक्यता आहे. इस्रायलवर अनावश्यक आणि प्रमाणाबाहेर लक्ष केंद्रीत केल्याबद्दल ट्रम्प यांनी 2018 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेतून माघार घेतली होती. परिषदेने आतापर्यंत कोणत्याही देशाविरोधात केलेल्या ठरावांच्या तुलनेत इस्रायलविरोधात सर्वात जास्त ठराव केले आहेत. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या तत्कालिन राजदूत निकी हेले यांनी मागणी केलेल्या अनेक व्यापक सुधारणांवरही परिषदेने कोणतीही कार्यवाही केलेली नव्हती.
परिषदेच्या या भूमिकेबद्दल ट्रम्प प्रशासनाने परिषदेचे सदस्य असलेल्या चीन, क्युबा, एरिट्रिया, रशिया आणि व्हेनेझुएलाकडे नाराजीही व्यक्त केली होती. मात्र याच सदस्य देशांवर मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे आरोप आहेत. परिषदेमध्ये बदल घडवण्यासाठी परिषदेच्या कामात सहभागी होणे गरजेचे आहे, हे लक्षात आल्यामुळे बायडेन यांनी या परिषदेत पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.