पुणे – पुण्याची मानांकित टेबल टेनिसपटू पृथा वर्टिकर हिने सलग दुसऱ्या दिवशी राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवले. गुरुवारी तीने 15 वर्षांखालील गटात विजेतेपद मिळविले होते. शुक्रवारी तिने 18 वर्षांखालील गटातही विजेतेपदाला गवसणी घातली.
मुंबईतील विले पार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत पृथाने मुलींच्या 18 वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत सोलापूरच्या समृद्धी कुलकर्णी हिचा 11-5, 11-6, 11-7, 11-5 असा पराभव केला.
सब-ज्युनियर गटात राष्ट्रीय विजेती असलेल्या पृथाला 15 वर्षाखालील गटातील विजेतेपदासाठी गुरुवारी लढत द्यावी लागली होती. मात्र, 18 वर्षांखालील गटात तिने समृद्धिला एकही संधी दिली नाही. आक्रमकता आणि टॉप स्पिनच्या जोरावर तिने वर्चस्व राखले.
त्यापूर्वी, उपांत्य फेरीत पृथाला मुंबईच्या संपदा भिवंडकर हिने चांगलेच झुंजवले होते. सात फेऱ्यांनंतर पृथाने संपदाचे आव्हान 5-11, 11-6, 11-5, 10-12, 11-14, 14-16, 11-8 असे मोडून काढले. समृद्धीने मुंबईच्या विधी शहा हिचा एकतर्फी लढतीत पराभव केला.
दरम्यान, कॅडेट गटाच्या अंतिम लढतीत मुलींच्या विभागात ठाण्याच्या रिआना भुता हिने विजेतपद मिळविले. अंतिम फेरीच्या लढतीत तिने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर नागपूरच्या इशिका उमाटे हिचा 11-2, 12-10, 11-7, 8-11, 11-5 असा पराभव केला. त्यापूर्वी उपांत्य फेरीत रिआना हिने दिव्यांशी भौमिक हिचा 11-2, 11-9, 11-5, 11-6 असा पराभव केला. इशिकाने अकोल्या जिल्ह्याच्या रिआ कोठारी हिला 6-11, 11-8, -9-11, 11-8, 11-5, 11-8 असे हरवले.