मुंबई : सध्या दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात चढाओढ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच शिवसेनेकडून ‘चलो शिवतीर्थ’ म्हणत दसरा मेळाव्यासंदर्भात बॅनरबाजी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या दसरा मेळाव्या संबंधी तयार करण्यात आलेल्या एका पोस्टरची सध्या राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरु आहे. कारण शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे औचित्य साधत ठाकरे कुटुंबातील आणखी एक ठाकरे राजकारणात एंट्री करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दादरमधल्या शिवाजी पार्कवर कोण दसरा मेळावा घेणार हे अद्याप ठरलेले नसले तरीही आता शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्ये तेजस ठाकरेंचा फोटो दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचा मुहुर्त साधत तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
शिवाजी पार्कच्या मैदानात दसरा मेळाव्यासाठी अद्याप पालिकेकडून कोणालाच परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच, शिवाजी पार्कचं मैदान दसरा मेळाव्यासाठी कोणालाही मिळणार नाही, अशी चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच शिवसेनेने मात्र यासर्व घडामोडींवर आक्रमक पवित्रा घेत थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा घेण्याची तयारी दर्शवली आहे. तशी तयारीही शिवसेनेकडून सुरु झाल्याची चर्चा आहे. गद्दारांना क्षमा नाही…!, अशा आशयाचे बॅनर शिवसेनेकडून झळकवण्यात आले असून दसरा मेळाव्याच्या बॅनरवरील तेजस ठाकरेंच्या फोटोमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणं आलं आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे परिवार आपला हुकमी एक्का बाहेर काढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.