इस्लामाबाद : पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर दहशतवादाशी संबंधित आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. इम्रान खान यांच्या आवाहनानुसार त्यांच्या तेहरिक ए-इन्साफ पक्षाने शनिवारी लाहोरमधील लियाकत बाग येथे निदर्शन आंदोलन केले होते. त्या आंदोलनाच्या अनुषंगाने इम्रान खान यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान खान यांच्याशिवाय खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली आमिन गंदापूर यांच्यावर आणि पीटीआय पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर गौहर खान यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीटीआय पक्षाच्या आंदोलनाविरोधात न्यू टाऊन आणि सिव्हील लाईन्स पोलीस स्टेशनांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये हत्येचा प्रयत्न, जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन आणि दहशतवादाशी संबंधित अन्य गुन्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना राष्ट्रीय यंत्रणेविरोधात निदर्शने करण्यासाठी भडकावले. त्यासाठी त्यांनी अदियाला तुरुंगातून मार्गदर्शन केले असल्याचेही या तक्रारींमध्ये म्हटले गेले आहे. इम्रान खान आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रीय संस्थांवर टीका केली , तोडफोड केली, हिंसाचारासह दगडफेक केलीअसा आरोपही करण्यात आला आहे.
शनिवारी इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाली होती. लियाकत बाग येथे आंदोलन करण्यासाठी पीटीआयचे हजारो कार्यकर्ते जमा झाले होते. मात्र पोलिसांनी रस्त्यांवर अडथळे उभे करून कार्यकर्त्यांना तिथपर्यंत पोचू दिले नव्हते. पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगड आणि विटांचा मारा करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यापूर्वी इम्रान खान यांनी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. मात्र पंजाब सरकारने सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांना अनुमती नाकारली आणि शहराच्या दिशेने जाणारे रस्तेबंद करून टाकले होते. पोलिसांबरोबरच्या बाचाबाचीनंतर अधिक संघर्ष टाळण्यासाठी पक्षाने आंदोलन स्थगित केले होते. लष्कराचे मुख्यालय रावळपिंडी येथ असून आंदोलनाचे ठिकाण तेथपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरच होते.