पिंपरी (प्रतिनिधी) – शाळेत लंगडी खेळताना पडल्याने दुसरीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना चिखली येथे गुरुवारी (दि. ३०) सकाळी घडली.
अंकिता गजानंद डोणे (वय ८, रा. जाधववाडी, चिखली) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता ही अभिनव विद्यालयातील दुसरीच्या वर्गात शिकत होती. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास शाळेत पीटीच्या तासाला अंकिता व इतर मुले लंगडी खेळत होती. ती लंगडीत घालत असताना अचानक कोसळली. यामुळे बेशुद्ध झालेल्या अंकिताला तिच्या शिक्षकांनी तिला त्वरित रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अंकिताच्या मृत्यूचे कारण समजले नसल्याने डॉक्टरांनी तिचा व्हिसेरा प्रयोगशाळेकडे पाठविला आहे.
अंकिताचे वडील लेबर कॉन्ट्रॅक्टर असून अंकिता आणि एक मुलगा, पत्नी असा त्यांचा परिवार आहे. ते मूळचे परळी वैजनाथ येथील उकळी या गावचे रहिवासी आहेत. तिच्या मृत्यूची वार्ता कळाल्याने चिखली परिसरात शोककळा पसरली आहे.