प्रशासन शहरातील रस्त्यावरील खांबाच्या जागेचेही शुल्क आकारणार
मेट्रोकडून दोन मार्गांवर 1 हजारहून अधिक खांब उभारले जाणार
पुणे – महापालिकेच्या जागांचे मूल्यांकन घटविणाऱ्या महामेट्रोला महापालिकेने आणखी एक झटका देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात महापालिकेच्या हद्दीत मेट्रो प्रकल्पासाठी जेवढे खांब उभारण्यात येणार आहेत. त्या खांबांसाठी लागणाऱ्या जागेचे शुल्क महापालिकेकडून वसूल केले जाणार आहे.
स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांत स्थानकांच्या खांबांसह मेट्रोसाठी तब्बल 1 हजारहून अधिक खांब उभारले जाणार आहेत. त्यामुळे या खांबांसाठी एकूण जागा निश्चित करून त्यानुसार शुल्क लावले जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली.
मेट्रो प्रकल्पाच्या जागांवरून महापालिका आणि महामेट्रोत वाद सुरू आहे. महामेट्रोकडून मेट्रो मार्गात बदल केल्याने महापालिकेस डीपी मध्ये नसलेल्या अनेक जागा महामेट्रोला द्याव्या लागत आहेत. मात्र, त्याचे मूल्यांकन बाजारभावाने न करता महामेट्रोकडून 2015 च्या रेडीरेकनरच्या दराने केले जात आहे. परिणामी, पालिकेने 410 कोटींच्या जागा दिल्या असताना मेट्रोने त्याचे मूल्य अवघे 157 कोटी केले आहे. त्यामुळे या दोन्ही विभागात जागांच्या मूल्यांकनासह जागांवरूनही वाद सुरू आहेत.
त्यातच, मेट्रोकडून पालिकेस वारंवार राज्य शासनाचे कारण देत 1 रुपये दराने जागा मागितल्या जात आहेत. तसेच, पालिकेच्या हिश्श्याच्या रकमेची वारंवार मागणी केली जात आहे. त्यामुळे महापालिकेनेही महामेट्रोला वठणीवर आणण्यासाठी त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने केलेल्या मूल्यांकनासह अनेक जागांचे शुल्कच अद्याप पालिकेने लावलेले नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यानुसार, आता पालिकेने मेट्रोचे खांब रस्त्यावर उभारण्यासाठी देण्यात येणाऱ्या जागेचे शुल्क निश्चित केले जाणार असून हे शुल्क पालिकेच्या हिश्श्यातून कमी केले जाणार आहे.
याशिवाय, स्थानकांसाठीचे खांब तसेच इतर जागांचेही शुल्क आकारले जाणार असून मालमत्ता विभागाकडून या जागेची मोजणी करण्याचे काम सुरू केले आहे.