सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ४६ वर्षीय सायमंड्सचा ऑस्ट्रेलियामध्ये एका कार अपघातात मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. क्विन्सलॅण्डमधील अॅलिक रिव्हर ब्रीज येथील हार्वे रेंज रोडवर सायमंडच्या गाडीचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
अॅलिक रिव्हर ब्रीजवर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून बाजूला जाऊन उलटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अपघात झाला. डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
सायमंड्सच्या मृत्यूनंतर अनेक दिग्गजांनी ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू जॉनस निल गिलेस्पीने सायमंड्सच्या मृत्यूसंदर्भात धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिलीय. “धक्कादायक बातमी आहे. आम्ही सर्वचजण तुला कायमच मीस करु मित्रा,” असं गिलेस्पीने म्हटलंय. तर दुसरीकडे अॅडम गिलक्रीस्टने, “हे खरोखर वेदनादायी आहे,” अशी प्रतिक्रिया दिलीय.
ऑस्ट्रेलियामधील वरिष्ठ क्रिकेट रिपोर्टर अशणाऱ्या रॉबर्ट कारडॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार टाउनस्वीलीपासून ५० किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला. क्विन्सलॅण्ड पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकानुसार अपघात झाला तेव्हा सायमंड्स हा गाडीमध्ये एकटा प्रवास करत होता.
सायमंड्सने ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळले आहेत. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व असणाऱ्या कालावधीत म्हणजेच १९९७ ते २००७ दरम्यान सायमंड्स हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग होता. त्यानंतर सायमंड्स हा फॉक्स क्रिकेटसाठी समालोचक म्हणून काम करत होता. सायमंड्सचा मृत्यू हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांसाठी या वर्षातील तिसरा धक्का आहे. यापूर्वी शेन वॉर्न आणि रॉड मार्श या दोघांचाही अशाच प्रकारे आकस्मिक मृत्यू झाला आहे.