Bhaskar Jadhav : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंना सर्वाधिक फटका कोकणात बसत आहे. कोकणातील माजी आमदार आणि उद्धव ठाकरेंचा खंदे समर्थक राजन साळवी यांनी काहीच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राजन साळवींच्या निमित्ताने कोकणातील एक भाग शिंदेंच्या गोटात गेलेला असताना आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधवही नाराज असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. यासंदर्भात भास्कर जाधव यांनीच उघड नाराजी व्यक्त केली आहे. ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत होते.
भास्कर जाधव काय म्हणाले ?
भास्कर जाधव म्हणाले की, मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, हे माझं दुर्दैव आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना शिबिरांमधून मला भाषण करण्याची संधी मिळायची. या पोराला महाराष्ट्रात फिरवा असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना म्हणायचे.
या पोराला जर महाराष्ट्रात फिरवला तर तळागाळातला माणूस जोडला जाईल, असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनोजर जोशींना सांगायचे. शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद मला लाभले, त्यानंतर पवार साहेबांचे आशीर्वाद मला लाभले. महाराष्ट्रात माझा एक वर्ग आहे, त्याचं समाधन आहेच. पण क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मला कधीही मिळाली नाही. माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला मला आडवं आलं, असं भास्कर जाधव म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, भास्कर जाधवांशी काल चर्चा झाली. शिवसेचे सर्व नेते आज आम्ही एकत्र भेटणार आहोत. कोणाची खंत असेल तर त्यावर आम्ही चर्चा करू, असं संजय राऊत म्हणाले.
भासकर जाधव आले तर आम्ही स्वागत करू : उदय सामंत
आमदार भास्कर जाधव विधिमंडळातील वरिष्ठ नेते आहेत. भविष्यात त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला फायदा होईल. ते आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू. ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या अनुभवाचा योग्य वापर केला नाही, हे पक्षाचे दुर्दैव आहे, असं विधान उदय सामंत यांनी केलं आहे. उदय सामंत यांच्या विधानानंतर भास्कर जाधव ठाकरेंची शिवसेना सोडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.