नवाब मलिकांचा आणखी एक खळबळजनक आरोप; म्हणाले,”क्रूझ पार्टीतील आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाचे वानखेडेंशी संबंध”

मुंबई :  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एनसीबीचे  अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात येत असलेल्या आरोपांची मालिका काही केल्या संपत नाही. कारण नवाब मलिक यांनी आजही पत्रकार परिषद घेत त्यांनी समीर वानखेडेंवर आणखी काही नवे आणि गंभीर आरोप  लावले आहेत. समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाशी संबंध असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मलिक यांनी वानखेडे, के.पी. गोसावी, प्रभाकर साईल आणि वानखेडेंच्या चालकाच्या सीडीआर तपासणीची मागणी केली आहे. इलेक्ट्रॉनिक तपास झाल्यास काही शंका राहणार नाही, असे मलिक यांचे मत आहे. मुंबईत झालेल्या क्रूझ पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आपल्या बंदुकधारी प्रेयसीसह सहभागी असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

याविषयी बोलताना मलिक म्हणाले, ही ड्रग पार्टी फॅशन टीव्हीने आयोजित केली होती. कोविड प्रोटोकॉल असूनही महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती, पोलिसांना या पार्टीची माहिती देण्यात आली नव्हती. गृहविभागालाही याबद्दल काही कल्पना नव्हती. या पार्टीत लक्ष्य करण्यात आलेल्या लोकांचे फोटो देऊन त्यांना अडकवण्यात आले. पण माझ्या माहितीनुसार, त्या पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया उपस्थित होता. त्याच्यासोबत त्याची बंदुकधारी प्रेयसीही होती.

जो तिथे नाचत असल्याचं दिसत आहे, तो दाढीवाला आहे. तो दाढीवाला कोण आहे हे एनसीबी च्या सर्वांना माहित आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, तो काही काळ तिहार कारागृहात होता, राजस्थानच्या कारागृहातही होता. याची मैत्री वानखेडेंसोबतही आहे. काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की गोव्यातही त्यांचं मोठं रॅकेट आहे.

ते पुढे म्हणाले, पण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर छापा टाकण्याची वेळ येत होती, वानखेडे कायमच छापेमारी टाळत आले. त्यांच्या चौकशीसाठी एनसीबी मुख्यालयातून जे लोक आलेत, त्यांच्याकडे मी मागणी करतो की त्यांनी क्रूझवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, प्रत्येक खोलीतलं फुटेज पाहावं. डान्सचं फुटेजही पाहावं. त्यानंतर जगातला एक मोठा ड्रग्जमाफिया तुम्हाला सापडेल. ही पार्टी त्यानेच आयोजित केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.