जीएसटीचा आणखी एक टप्पा कमी होणार

मात्र काही वस्तूंवरील जीएसटी वाढण्याची शक्‍यता

पुणे – वारंवार नियम बदलण्याचे आरोप जीएसटी यंत्रणेवर होत असतानाच आता आणखी एक टप्पा कमी करण्यावर विचार सुरू आहे.

जीएसटीमध्ये सध्या 5, 12, 18 आणि 28 टक्‍के असे कराचे टप्पे आहेत. शिवाय, काही वस्तूंवर कर नाही, तर काहींवर अधिभार आहे. कराचे जास्त दर असल्यामुळे महसूल अपेक्षेपेक्षा कमी होत आहे. यातून मार्ग काढण्याकरिता जीएसटी परिषदेमध्ये एक टप्पा कमी करण्यावर विचार होणार आहे. फक्त 8, 18 आणि 28 टक्‍के हे तीनच टप्पे ठेवले जाणार आहेत. यामुळे काही वस्तूंवरील जीएसटीचा दर वाढणार आहे तर, काही वस्तू आणि सेवांवरील जीएसटीचा दर कमी होऊ शकतो. मात्र, या फेरबदलांमध्ये मोबाइल हॅन्डसेट आणि त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या इतर भागांवरील जीएसटी वाढवू नये, असा आग्रह मोबाइल उत्पादक आणि वितरकांच्या संघटनेने केला आहे.

मोबाइल उत्पादक व वितरक संघटना अस्वस्थ
मोबाइल सध्या एक जीवनावश्‍यक बाब झाली आहे. सरकारच्या अनेक योजना आणि डिजिटल पेमेंट मोबाइलच्या माध्यमातून होते. त्यामुळे मोबाइल महाग होईल असे काही करू नये, असा आग्रह राज्यांना करण्यात येत आहे. 2013-14 मध्ये 57 हजार कोटी रुपयांचे मोबाइल विकले गेले होते. तर 2018-19 मध्ये यात 315 टक्‍क्‍यांची वाढ होऊन 1.8 लाख कोटी रुपयांचे मोबाइल विकले गेले आहेत. जे क्षेत्र वाढत आहे आणि उपयोगी आहे अशा क्षेत्राला करात वाढ करून शिक्षा करू नये, असे या संघटनेने म्हटले आहे. या नवीन टप्प्यामध्ये मोबाइलवरील कराचा दर 12 वरून 18 टक्‍के केला जाण्याची शक्‍यता असल्यामुळे ही संघटना अस्वस्थ झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.