अर्ज कन्फर्म न झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करता येणार
पुणे – एमएचटी-सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. मात्र, काही कारणाने त्याचे शुल्क जमा झाले नाहीत अथवा शुल्क भरू शकले नाही. अर्ज केला, पण शुल्क न भरल्याने अर्ज कन्फर्म झाला नाही, अशा विद्यार्थ्यांना राज्य सीईटी सेलने 23 मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्यक असलेली सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी) यंदा 4 लाख 39 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. गतवर्षीही सीईटीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 4 लाख 34 हजार इतकी होती. यावर्षी सीईटीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या 5 हजारांनी वाढली आहे.
दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले. मात्र, त्यांना वैयक्तिक व तांत्रिक कारणाने त्यांना शुल्क भरता आले नाही. त्या पार्श्वभूमीवर अशा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांनी केली होती. त्याचा विचार करून राज्य सीईटी सेलने प्रलंबित अर्ज राहिलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी लिंक खुली केली असून, त्यासाठी 23 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत केंद्रीय पद्धतीने व ऑनलाइनद्वारे ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या सीईटीसाठी नियमित शुल्कासह 7 जानेवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करण्याची मुदत होती. त्यानंतर विलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी 1 ते 7 मार्च अशी मुदत होती. यंदा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 9 हजार 671 विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्णपणे भरलेला नाही, त्यांना स्वत:च्या लॉग-इनवरून आता शुल्क भरून सीईटी परीक्षा देता येणार आहे.