नांदूर – सहजपूर (ता. दौंड) येथे शुक्रवार (दि. 7) पुन्हा करोना बाधित सापडल्याची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी दिली. दौंड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये तालुक्यासह पुणे, बारामती, पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक कामगार, अधिकारी काम करतात. त्यामुळे संक्रमण वाढत आहे. सध्या प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणचे उत्पादन पुन्हा जोरदार सुरू झाले आहे.
संबंधित क्षेत्रांमध्ये नव्याने काळजी घेण्याची गरज निर्माण होत आहे. सहजपूरचे सरपंच निलेश म्हेत्रे म्हणाले की, गावातील लोकांची काळजी घेण्यासाठी तसेच संक्रमण रोखण्यासाठी परिसरातील कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रातून कामगारांची वाहतूक करू नये.
या भागात औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे; परंतु कंपनी खरी माहिती देत नाही. तसेच संबंधित कागदोपत्री माझ्याकडे आली नाहीत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.