राज्यस्तरीय मूकनाट्य स्पर्धा : थिएटर वर्कशॉप कंपनीचा पैस करंडक पटकावला
तळेगाव दाभाडे – चिंचवड येथे थिएटर वर्कशॉप कंपनी आयोजित “पैस करंडक 2019′ या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय खुली एकपात्री व सांघिक मूकनाट्य स्पर्धा झाली. हे या स्पर्धेचे पाहिले वर्ष होते.
या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून एकपात्री सादरीकरणासाठी 15 लहान गट आणि 15 खुला गट अशा एकूण 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या विभागाचे परीक्षण किरण येवलेकर यांनी केले.
तसेच राज्यभरातून मूकनाट्यासाठी एकूण आठ संघांनी भाग घेतला होता. यासाठी वेळ मर्यादा 15 ते 20 मिनिटे अशी होती. या मूक नाट्यांच्या परिक्षण, अभिनयाचा विक्रम करून लिम्का बुकात नोंद झालेले श्रीकृष्ण कालमित्र आणि पिंपरी-चिंचवड नाट्यपरिषदेचे कार्यकारिणी सदस्य किरण येवलेकर यांनी केले.
यातील मूकनाट्य स्पर्धेत कलापिनी, तळेगाव दाभाडे या संघाने सादर केलेल्या “रोबोला जेव्हा जाग येते…’ या गाजलेल्या मूकनाट्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आणि या वर्षीचा पैस करंडक प्रदान करण्यात आला.
या मूकनाट्याचे लेखन-दिग्दर्शन मनोज काटदरे यांचे होते. संकल्पना डॉ. अनंत परांजपे यांची असून, विपुल परदेशी, अविनाश शिंदे आणि मनोज काटदरे यांनी या मूकनाट्यात भूमिका केल्या होत्या, तर रंगभूषा संजीवनी काटदरे यांची होती.
या नाटकाची प्रकाश योजना चेतन पंडित यांची व तसेच पार्श्वसंगीत विशाखा बेके आणि चैतन्य जोशी यांचे होते. या मूकनाट्याचे सूत्रधार चैतन्य जोशी व रंगमंच व्यवस्था आदिती आपटे, मुक्ता भावसार आणि हृतिक पाटील यांची होती. पारितोषिक विजेत्या संघाचे कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, विश्वस्त डॉ. अनंत परांजपे आणि सर्व कलापिनी परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.