“पंगा’ आणि “मनिकर्णिका’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खुशीत असलेल्या कंगनाच्या खुशीत आणखी भर पडण्यासाठी आज आणखी एक कारण मिळाले आहे. तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावरील “थलायवी’चा ट्रेलर आज रिलीज झाला.
जयललितांच्या भूमिकेत कंगनाने भाषणातून केलेली डायलॉगबाजी ऐकल्यावर अंगावर शहारे उभे राहतात. कंगनाच्या बरोबर एमजी रामचंद्रन यांच्या रोलमध्ये तमिळमधील स्टार अरविंद स्वामी दिसणार आहे.
जयललितांची भाषणे कंगनाने जशीच्या तशी गाजवली आहेत. भर सभेमध्ये अपमान सहन करून मुख्यमंत्रिपदापर्यंत प्रगती करणाऱ्या कंगनाला ट्रेलरमध्ये बघितल्यावर जयललिता यांचीच आठवण होते.
अत्यंत गरिबी आणि कष्टातून सिनेमा स्टार आणि मुख्यमंत्री म्हणून जयललिता यांचा प्रवास “थलायवी’तून दिसणार आहे. जयललितांना तामीळनाडूमध्ये जेवढी प्रचंड लोकप्रियता मिळाली होती, त्याचे प्रत्यक्ष दर्शन “थलायवी’तून बघायला मिळणार आहे.
“थलायवी’ हिंदीबरोबर तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळममध्येही होणार आहे. दक्षिणेत तर या सिनेमाची प्रचंड क्रेझ असणार हे उघडच आहे. मात्र, त्याबरोबरच संपूर्ण भारताला जयललितांचा बायोपिक अनुभवता येणार आहे. ही कंगनाच्या दृष्टीने अधिक मोलाची कामगिरी असणार आहे.