महापालिकेच्या आणखी एका अधिकाऱ्याचे करोनाने निधन

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षक साईनाथ लाखे यांचे आज (बुधवारी) पहाटे करोनाने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

शहरात करोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप दिसून येत नसल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. वायसीएम रुग्णालयाच्या चाणक्य विभागात कार्यालयीन अधिक्षक असलेल्या साईनाथ लाखे यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सुरुवातीला वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते.

मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. लाखे यांच्या निधनाबद्दल वायसीएम रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.