पाचगणी -पाचगणीच्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर अल्पमतात आलेल्या उपनगराध्यक्षा सौ. सुलभा लोखंडे यांच्या पदाकडे विरोधी नगरसेवकांनी मोर्चा वळविला आहे. त्यांना पदावरून तात्काळ दूर करण्यासाठी विशेष सभा घ्यावी, अशी मागणी करणारे पत्र 13 नगरसेवकांनी आज नगराध्यक्षांना दिल्याने पाचगणीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, उपनगराध्यक्षा सौ. लोखंडे यांनी अचानक राजीनामा दिल्याने “कहानी मे’ आणखी ट्विस्ट निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्यावर पालिकेच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आज या नगरसेवकांनी उपगराध्यक्षांना लक्ष्य करीत त्यांनाही उपनगराध्यक्ष पदावरून हटवावे, यासाठी विशेष बैठक घेण्याची मागणी नगराध्यक्षांकडे सह्यानिशी लेखी पत्राद्वारे केल्याने पाचगणीचे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
या पत्रात नगरसेवकांनी म्हटले आहे की उपनगराध्यक्षा सौ. सुलभा लोखंडे या पदावर आल्यापासून चुकीच्या पद्धतीने व मनमानी पद्धतीने वागत आहेत. त्या कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता काम करत आहेत. कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागतात. विकास कामांबाबत वरिष्ठ पातळीवर कोणताही प्रयत्न न करता एखाद्या कामाचा इश्यु करून वाद निर्माण करतात. तर तक्रारी करण्यास प्रोत्साहन देतात. शासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कोणतीही योजना
राबविण्यात सातत्याने असहकार्याची भूमिका घेतात. त्यामुळे शासनाकडून विकास कामासाठी येणाऱ्या निधीचे नुकसान होत आहे. उपनगराध्यक्ष हे ज्या कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्या कमिटीचे प्रश्न मार्गी लावण्यात फार मोठ्या प्रमाणात कुचराई करतात. कमिटीच्या सभा वेळेवर घेत नाहीत. त्यामुळे शहरातील विकास कामे रखडली आहेत. त्यास उपनगराध्यक्ष जबाबदार आहेत. त्यामुळे त्याना उपनगराध्यक्ष पदावर राहण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही, असे या पत्रात नमूद केले आहे. पत्रावर विठ्ठल बगाडे, नरेंद्र बिरामणे, विनोद बिरामणे, अनिल वने, विजय कांबळे, पृथ्वीराज कासुर्डे, नीता कासुर्डे, रेखा जानकर, रेखा कांबळे, अर्पणा कासुर्डे, हेमा गोळे, आशा बगाडे, सुमन गोळे या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उपाध्यक्षांच्या राजीनाम्याने खळबळ उपनगराध्यक्षा सौ. सुलभा लोखंडे यांनी आपल्या पदाचा आज तडकाफडकी राजीनामा दिल्याने पाचगणीच्या राजकीय घडामोडींना आणखी वेग घेतला आहे. सौ. लोखंडे यांनी आपल्या राजीनामा पत्रात घरगुती कारण दिले असले तरी अचानक राजीनामा दाखल झाल्याने यामागची कारणे काय आहेत? याची पाचगणी शहरात उलटसुलट चर्चा चालू झाल्या आहेत..
सत्ताधारी गटाने सुलभा लोखंडे यांना उपनगराध्यक्षपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ ठरवून दिला होता. 30 जूनला त्यांची मुदत संपली होती. म्हणूनच त्यांनी सकाळी दहा वाजता कार्यालयात येऊन साडेअकरा वाजता राजीनामा दिला. विरोधकांना आता कशाचेही श्रेय लाटायचा रोग जडला असून 13 ची बेरीज सांगणाऱ्या नगरसेवकांच्या पत्रावर 12 सह्या आहेत, अन् अविश्वास ठरावासाठी त्यांचे अवघे चार नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे त्यांना घाबरून राजीनामा द्यायला लोखंडे कच्च्या गुरूच्या चेल्या नाहीत, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे.
सौ. लक्ष्मी कऱ्हाडकर, नगराध्यक्षानगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्यावरील अविश्वास ठरावानंतर आता आम्ही उपनगराध्यक्षानाही पदच्युत करण्यासाठी पत्र देणार असल्याची चाहुल लागल्यानेच उपनगराध्यक्षांनी राजीनामा दिला. परंतुु, अविश्वास ठरावाने नगराध्यक्षांच्या पायाखालची वाळू सरकली असून आता उपनगराध्यक्षपदाच्या अविश्वासाने आणखी शोभा होऊ नये म्हणून नगराध्यक्षांनी ही पळवाट शोधून काढल्याचा घणाघात बिरामणे यांनी केला आहे.
नरेंद्र बिरामणे, नगरसेवक