NEET Paper Leak Case : देशभरात गाजत असलेल्या ‘नीट-यूजी 2026’ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यात आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा संजय हवालदार (रा. सदाशिव पेठ) यांना शुक्रवारी अटक करण्यात आली.

या प्रकरणात पुण्यात झालेली ही सीबीआयची पाचवी अटक असून, विशेष म्हणजे आतापर्यंत अटक झालेल्या तीन महिला आरोपींचे नाव ‘मनीषा’ असल्याने तपास यंत्रणांमध्येही या ‘मनीषा कनेक्शन’ची चर्चा रंगली आहे. त्यामुळे तिन्ही महिला आरोपींची नावे एकच आहेत हा निव्वळ योगायोग आहे की यामागे आणखी काही वेगळे कनेक्शन आहे, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

मनीषा हवालदार या पुढील महिन्यात सेवानिवृत्त होणार होत्या. मात्र निवृत्तीपूर्वीच त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांचे दुसऱ्या आरोपी प्रा. मनीषा मांढरे यांच्याशी जवळचे संबंध होते आणि दोघींमध्ये वारंवार संपर्क होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने हवालदार यांची ‘नीट’ परीक्षेसाठी भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या गोपनीय प्रक्रियेतील महत्त्वाची माहिती त्यांच्याकडे होती. सीबीआयच्या तपासानुसार, एप्रिल 2026 मध्ये त्यांनी भौतिकशास्त्र विषयातील काही गोपनीय प्रश्न प्रा. मनीषा मांढरे यांच्यासोबत शेअर केल्याचा आरोप आहे.

तपासादरम्यान लीक झालेले प्रश्न आणि प्रत्यक्ष परीक्षेत विचारलेले प्रश्न एकसारखे असल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. या प्रकरणात पुण्यातून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये ब्युटीपार्लर चालक मनीषा वाघमारे, रसायनशास्त्र तज्ज्ञ प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, जीवशास्त्र शिक्षिका प्रा. मनीषा मांढरे आणि मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांचा समावेश आहे.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनंतर, सीबीआयने शुक्रवारी सकाळी शेठ हिरालाल सराफ प्रशालेत छापा टाकून हवालदार यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मुख्याध्यापिकेचे नाव समोर आल्यानंतर ‘विद्या प्रसारिणी सभा’ने तातडीने कारवाई करत त्यांना सेवेतून निलंबित केले आहे.

आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

या पेपरफुटी प्रकरणाचा तपास देशभरात सुरू असून, सीबीआयने पुणे, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, लातूर, दिल्ली आणि अहिल्यानगरसह अनेक शहरांमध्ये छापेमारी केली आहे. आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून लॅपटॉप, मोबाईल, हार्ड डिस्क, बँक व्यवहारांची कागदपत्रे आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपास पुढे जात असताना आणखी काही प्राध्यापक आणि क्लास चालकांची नावे समोर येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी मोठे मासा गळाला लागणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : Pune District : विकासकामांच्या कोट्यावधींच्या निधीला विरोध; राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पत्राचा निषेध