जम्बो हॉस्पिटलसाठी आणखी दीर्घ प्रतीक्षा

234 ऑक्‍सिजन बेड आणि 52 कोटीचे बजेट; वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसाठी नऊ निविदा

सातारा -बस स्थानकाशेजारील हजेरीमाळावरील छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या इमारतीत सुरू असणाऱ्या जंबो हॉस्पिटलच्या कामातील प्रत्यक्ष अडचणी आता समोर येऊ लागल्या आहेत. विशेषज्ज्ञ डॉक्‍टरांची सेवा देऊ शकणाऱ्या एजन्सीचा अद्याप शोध संपलेला नाही. प्राप्त नऊ निविदांपैकी एकच निविदा उघडण्यात आली असून आणखी आठ निविदांच्या तांत्रिक प्रक्रियेत वेळ जाणार असल्याने जंबो हॉस्पिटल प्रत्यक्ष सुरु होण्यास दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो असे संकेत मिळत आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड दौऱ्यात सर्वसामान्यांना करोना संसर्गाचे उपचार मिळावेत यासाठी जंबो हॉस्पिटलच्या उभारणीच्या सूचना केल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या इमारतीची पाहणी केली.
तत्काळ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जंबो हॉस्पिटलच्या उभारणीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली.

या निविदासाठी राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ संस्थांनी प्रतिसाद दिला आहे. या नऊपैकी प्रशासनाच्या वतीने केवळ दोन कोटीची एकच निविदा उघडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या ऑक्‍सिजन पुरवठ्याच्या सेंट्रल लायनिंगचे काम सध्या सुरू आहे. या उभारणीचा कार्यभार “क्रेडाई’ला देण्यात आला आहे. तब्बल आठ निविदा उघडून प्रत्यक्ष कामाची सुरवात आणि त्यांची पूर्तता यामध्ये बराच कालावधी जाणार असल्याने आणखी दोन महिने हॉस्पिटल सुरू होण्यास प्रतीक्षा करावी लागण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे .

पुणे येथे 89 कोटी रूपये खर्च केलेल्या जंबो हॉस्पिटलच्या उभारणीनंतर त्याच्या त्रुटींचीच जास्त चर्चा झाली. तब्बल 25 वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजीनामा देण्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. तशा अडचणी साताऱ्यात येऊ नये अशी अपेक्षा आहे. 234 ऑक्‍सिजन व 52 व्हेंटिलेटर बेड असे दोन स्वतंत्र कक्ष आणि प्रत्येकी सहा तास याप्रमाणे चार पाळ्यांमध्ये चार डॉक्‍टर याप्रमाणे नियोजन करावे लागणार आहे. मात्र, कोविड कक्षाला येण्यास वैद्यकीय अधिकारी खासगीमध्ये नाराजी व्यक्त करतात. 

त्यामुळे जंबो हॉस्पिटलला सक्षम वैद्यकीय अधिकारी नेमून त्यांची व्यवस्था चोखपणे ठेवणाऱ्या एजन्सीची खरी अडचण आहे. अशा सक्षम एजन्सीचा शोध जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सुरू आहे. साधारण कोविड नॉर्म्सप्रमाणे जंबो हॉस्पिटलला किती डॉक्‍टर लागू शकतील याची चाचपणी सुरू आहे. 

जंबो हॉस्पिटलचे 25 टक्के काम पूर्ण झाले असून अन्य पायाभूत सुविधांची तयारी सुरू आहे. मात्र, इतर निविदांप्रमाणे प्रत्यक्ष कामांचा कालावधी लक्षात घेता हॉस्पिटल उभारणीला काही महिने जाणार हे स्पष्ट होऊ लागले आहे. जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सातशेच्या पलीकडे पोहचली आहे. त्यामुळे जंबो हॉस्पिटलच्या पूर्णत्वाला युद्ध पातळीवर गती देणे आवश्‍यक बनले आहे.

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची आवश्‍यकता
राज्याच्या मंत्रीपातळीवर तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यातील जंबो हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तरीही हॉस्पिटल अपेक्षेप्रमाणे लवकर सुरू होण्याची चिन्हे नाहीत. सध्या करोनाचा कहर वाढला आहे. रोज आठशे ते नऊशेच्या दरम्यान रुग्ण निष्पन्न होत आहेत. रुग्णांचा आकडा पंचवीस हजारांच्या पुढे गेला आहे. मृत्यूचे रोजचे प्रमाण 30 ते 35 च्या दरम्यान पोहचून करोनाने सातशेहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

रोजच्या ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या वाढती असल्याने सद्यस्थितीत रुग्णालयांमध्ये जागा नाही, बेड उपलब्ध होत नाही, ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटर मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अशा वेळी जंबो हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जंबो हॉस्पिटलची उभारणी लवकर पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.