कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी करोनाच्या दुसऱ्या लाटेतही आ. महेश शिंदे हे धन्वंतरीच्या रूपाने कार्यरत झाले आहेत. उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या 122 बेड्सच्या काडसिद्ध कोविड हॉस्पिटलनंतर आता वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेल्वे स्टेशननजीक जीतराज मंगल कार्यालयात शंभर बेड्सचे सुसज्ज आणि सर्वाधिक 90 ऑक्सिजन बेड्सचे नवीन कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आणि आ. महेश शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे व मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच या कोविड हॉस्पिटलचा शुभारंभ होणार आहे.
मतदारसंघातील जनता हेच आपले कुटुंब आहे, असे समजून महेश शिंदे यांनी आमदार होण्यापूर्वीच कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यात काम सुरू केले. जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिल्यानंतर आ. शिंदे यांनी अभिनव पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी स्वखर्चाने कोविड हॉस्पिटल उभे केले होते. स्वखर्चाने कोविड हॉस्पिटल उभारणारे ते राज्यातील पहिले आमदार ठरले होते. त्याचबरोबर महानगरांमध्ये काम करत असलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा ताफा त्यांनी या कोविड सेंटरमध्ये बाधितांच्या सेवेत दाखल केला होता.
त्यांनी आयसीयूसह व्हेंटिलेटर बेड्सची सुविधाही उपलब्ध करून दिली होती. करोनाच्या पहिल्या लाटेत सात हजार 30 रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी व उपचार केले होते. कोविड सेंटरमध्ये 1430 रुग्णांवर विनाशुल्क उपचार करण्यात आले होते. सद्य स्थितीत येथे 122 हून अधिक रुग्ण उपचार घेत असून, ऑक्सिजन बेड्सची संख्या जास्त आहे. परदेशातून आयात केलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचाही वापर केला जात आहे. रुग्णांच्या नाश्ता व जेवणाची व्यवस्थादेखील आ. महेश शिंदे यांच्यामार्फत करण्यात आली होती.
मतदारसंघातील अत्यवस्थ रुग्णांवरील उपचारांची व्यवस्था त्यांनी पुणे, मुंबई व अन्य मोठ्या शहरांमध्ये केली होती. त्याचबरोबर समाजातील गरजूंना आर्थिक व जीवनावश्यक साहित्याची मदत केली. करोनाच्या दुसऱ्या लाटेतही आ. शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधत शंभर बेड्सचे आणखी एक कोविड हॉस्पिटल सुरू करायचा निर्णय घेतला. या कोविड हॉस्पिटलच्या उभारणीचे काम रेल्वे स्टेशननजीक जीतराज मंगल कार्यालयात युद्धपातळीवर सुरू आहे.
कोरेगावातील सर्व रुग्णांना मोफत जेवण
कोरेगावातील सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनादेखील आता मोफत जेवण दिले जाणार आहे. त्यासाठी संतोष (आबा) जाधव, मो. 9224436688, 7588637545 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रुग्णवाहिकेमुळे वाचले शेकडो रुग्णांचे प्राण
आ. महेश शिंदे यांनी सर्वात प्रथम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कोरेगाव नगरपंचायतीसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका खरेदी केली. या रुग्णवाहिकेमुळे शेकडो बाधितांचे प्राण वाचले आहेत. एका फोन कॉलवर रुग्णवाहिका हजर होत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.