उत्तर प्रदेशातच झाली “या’ घटनेची पुनरावृत्ती

बंदुकीचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार

कानपूर, दि. 19 – उत्तर प्रदेशमध्ये आणखी एका दलित महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली असून ही घटना म्हणजे हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती मानण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या पिडीत दलित महिलेवर किमान आठ दिवसांपूर्वी, बंदुकीचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार झाला असून, रविवार दि. 18 रोजी या घटनेची माहिती मिळाल्याचे, कानपूर ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे.

पिडीतेच्या पालकांनी याबाबत कानपूर ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली असून, मागील आठवड्यात, या घरातील 22 वर्षीय तरुणी घरात एकटी असताना, तिच्यावर बंदुकीचा धाक दाखवत दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समजते. विशेष म्हणजे बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये गावाच्या मुखियाचाही समावेश असल्याचे तक्रादरांचे म्हणणे आहे.

झाल्या घटनेविषयी कोणाला माहिती दिल्यास जिवे मारले जाईल, अशी धमकी आरोपींनी दिल्याने पिडीत तरुणीने याविषयी कोणालाही माहिती दिली नव्हती. मात्र, त्यानंतर प्रकृती बिघडल्याने पिडीतेला उपचारांसाठी दवाखान्यात नेताच, सारा प्रकार उघडकीस आल्याने पिडीतेच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे समजते. त्यानुसार भारतीय दंडविधान संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती कायद्याच्या (ऍट्रॉसिटी) विविध कलमांद्वारे हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कानपूर ग्रामीणच्या डेरापूर सर्कलतर्फे पोलिसांचे पथक स्थापन करण्यात आले असून फरार आरोपींच्या अटकेसाठी वेगाने मोहिम राबवण्यात येत आहे. हाथरस येथे मागील महिन्यात झालेल्या दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच, उत्तर प्रदेशातच आणखी एका दलित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघडकीस आल्याने योगी सरकार अडचणीत आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.