लंडन – लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहलने केलेल्या अफलातून गोलंदाजीनंतरही मोईन अली, डेव्हीड विली, जॉनी बेअरस्टो व जेसन रॉय यांनी केलेल्या जबादार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 49 षटकांत सर्वबाद 246 धावा केल्या. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जिंकून भारताने आघाडी घेतली असून या सामन्यासह मालिकेत बरोबरी करण्याची इंग्लंडला संधी आहे. तसेच ज्या मैदानावर फारसे यश मिळाले नसल्याने हा नकोसा इतिहास बदलण्याची भारतालाही संधी आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत इंग्लंडला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्यांच्या रॉयस व बेअरस्टो या सलामीवीरांनी सुरूवातही चांगली केली होती. मात्र, हे दोघेही स्थिरावल्यावर स्वस्तात बाद झाले. बेअरस्टोने 38 तर रॉयने 23 धावा केल्या. हार्दीक पंड्याने रॉयला तर यजुवेंद्र चहलने बेअरस्टोला बाद केले. त्यानंतर चहलने ज्यो रूट (11) व बेन स्टोक्स (21) यांना बाद करत त्यांचा डाव अडचणीत आणला.
दुसरीकडे महंमद शमीने धोकादायक कर्णधार जोस बटलरला बाद केले व भारताच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. लियाम लिव्हिंगस्टोन व मोईन अली यांनी डाव सावरताना संघाला दीडशतकी धावांपर्यंत पोहोचवले. लिव्हिंगस्टोनही स्थिरावल्यावर पंड्याच्या गोलंदाजीवर 33 धावांवर बाद झाला. अली याने मात्र संयमी फलंदाजी करत एक बाजू सावरून धरली. त्याला डेव्हीड विलीने चांगली साथ दिली. अली अर्धशतकाच्या जवळ आलेला असताना 47 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 64 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. त्यालाही चहलनेच तंबूचा रस्ता दाखवला.
विलीही आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात 41 धावांवर परतला. त्याने या खेळीत 49 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 2 षटकार फटकावले. जसप्रीत बुमराहने विलीला बाद केले. त्यानंतरक क्रेग ओव्हरटर्नने थोडी चमक दाखवली. मात्र, बुमराहसह प्रसिद्ध कृष्णाने त्यांचा डाव 49 षटकांत 246 धावांवर संपवला. चहलने सर्वाधिक 4 गडी बाद केले. बुमराह व पंड्या यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शमी व कृष्णाने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
कोहलीला संधी
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय लढतीत दुखापतीमुळे बाहेर असलेल्या विराट कोहलीला या सामन्यात संघात स्थान देण्यात आले. त्याने आपण पूर्ण तंदुरुस्त ठरल्याचे सिद्ध केले.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड – 46 षटकांत सर्वबाद 246 धावा. (मोईन अली 47, डेव्हीड विली 41, जॉनी बेअरस्टो 38, लियाम ल्व्हिंगस्टोन 33, जेसन रॉय 23, बेन स्टोक्स 21, यजुवेंद्र चहल 4-47, हार्दीक पंड्या 2-28, जसप्रीत बुमराह 2-49).