बांधकाम व्यावसायिकाला पिस्तूल दाखवत 1 कोटी 88 लाखांची मागणी
पुणे – बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्यानंतर त्याला पिस्तूलचा धाक दाखवून मारहाण केल्याच्या आरोपावरून स्वयंघोषित पत्रकार देवेंद्र जैन, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे आणि निलंबित पोलीस कर्मचारी शैलेश जगताप यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यातील जैन, जगताप यांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.
“या बांधकाम व्यावसायिकाकडून वरील व्यक्ती आणि त्यांच्या अन्य चार सहाकऱ्यांनी 72 लाख रुपये लाटले. यानंतर पिस्तूलचा धाक दाखवत मारहाण करून आणखी 1 कोटी 88 लाख रुपयांची मागणी केली,’ अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बांधकाम व्यावसायिक हृषिकेश अशोक बारटक्के (35, रा. मायोला रेसिडन्सी, बाणेर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. यानुसार बडतर्फ पोलीस परवेज शब्बीर जमादार (35 रा. सोमवार पेठ पोलीस लाइन), जयेश जितेंद्र जगताप (30, रा. घोरपडे पेठ), अमित विनायक करपे (33, रा. रास्ता पेठ) यांना अटक केली आहे. तर शैलश जगताप, देवेंद्र जैन हे दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कोठडीत होते. त्यांना रविवारी जामीन मिळताच या प्रकरणात आता समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. रवींद्र बऱ्हाटे (रा. सिंहगड) हा फरार आहे. प्रकाश फाले (रा. सांगवी) याचा समर्थ पोलीस शोध घेत आहेत. बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन जैन, बऱ्हाटे, जगताप अमोल चव्हाण आणि अन्य एका महिलेवर दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात नुकताच दाखल झाला आहे.
…असे आहे प्रकरण
बारटक्के यांना 2017 ते 2018 दरम्यान आरोपींनी सेनापती बापट रस्त्यावर 7,500 चौ. फुटांचा भूखंड व त्यावरील 1,000 चौ. फुट बंगला प्रकाश फालेंचा असल्याचे सांगितले. फाले आणि जयेश जगताप यांच्यात झालेल्या बनावट करारनाम्याची प्रत दाखवली. “या जागेबाबत फाले यांच्या न्यायालयीन दाव्यावर युक्तीवाद पूर्ण झाला असून निकाल तीन महिन्यांत आमच्या बाजूने लागेल,’ असा विश्वास देण्यात आला. जागेवरील हक्क सोडण्यासाठी 2 कोटी व जागा मालक म्हणून फाले यांना 2.5 कोटी देण्याचा व्यवहार ठरला. यासाठी फिर्यादींनी फाले यांना 49 लाख 30 हजार रुपये दिले तर अमित करपे याच्या बॅंक खात्यात 11 लाख 50 हजार रुपये वर्ग केले. शैलश जगतापसाठी 50 हजार रुपये भरुन मोटारीचे बुकिंग केले. यानंतर जयेश व शैलेश या दोघांनी वेळोवेळी केलेल्या पैशांच्या मागणीनुसार बॅंकेत सोने गहाण ठेऊन 11 लाख रुपये दिले. या सर्व व्यवहारावेळी बऱ्हाटे, जैन हेदेखील सहभागी होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.
मी गनमॅन; आम्ही लोकांची वसुली करतो
तीन महिने संपल्यावर फिर्यादी बारटक्के जागेबाबत विचारणा करण्यास गेले असता, आरोपींनी टाळाटाळ केली. फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांना समर्थ पोलीस ठाण्यासमोर बोलावून जगताप, त्याचा पुतण्या जयेश जगताप, बऱ्हाटे, परवेझ जमादार बसलेले होते. तेथे फिर्यादीला शैलेश, परवेझ आणि जयेश यांनी त्यांना मारहाण केली. यानंतर शैलेश याने ड्रॉव्हरमधून पिस्तूल काढून कानशिलात लगावली. “मला राहिलेले 1 कोटी 88 लाख रुपये द्यायचे नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. त्याने “मी गनमॅन म्हणून प्रसिद्ध आहे. तुला माहीत नाही का? आम्ही लोकांकडून वसुली करतो, तू आमच्याकडून वसुली करणार का?’ असा जाब विचारला. या घटनेमुळे फिर्यादी घाबरले होते. यामुळे तेव्हा त्यांनी तक्रार दिली नाही. दरम्यान, परवेझ जमादार याने “ऍक्सेस गाडी मला घेऊन पाठव’ असा निरोप फिर्यादीला दिला. यामुळे जीवाला घाबरुन त्यांनी परवेझला ऍक्सेस गाडी घेऊन दिली.