पुणे – माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलिस शैलेंद्र जगताप आणि स्वयंघोषित पत्रकार देवेंद्र जैन यांच्या टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. प्लॉटच्या व्यवहारात रक्कम गुंतविल्यास दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून 18 लाख रुपये लाटण्यात आले होते. हे पैसे परत मागितल्यावर संबंधीत व्यक्तीस जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात बऱ्हाटे, जगताप आणि जैनसह 12 जणांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरणी व्यवसायीक सोहम उत्तम आढाव(30,रा.रामटेकडी, वानवडी) यांनी दिली आहे. तर प्रकाश फाले, सविता प्रकाश फाले, यश फाले, जयेश जगताप, शैलेश जगताप, परवेज जमादार, देवेंद्र जैन, रविंद्र बऱ्हाटे, विनय मुंदडा, मुकेश पौडवाल, धिरज जाधव, ऍड.विजय काळे अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनूसार सन 2017 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान प्रकाश फाले यांनी जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचा बंगला(औंध) व शिवाजीनगर येथील शिवाजी हौसिंग सोसायटीतील प्लॉटचा ते स्वत: व्यवहार करत असल्याचे सांगितले.या व्यवहारात रक्कम गुंतविल्यास दाम दुप्पट रक्कम मिळेल असे आमिष दाखवले. यानंतर माझ्या घरी येऊन 17 लाख रुपये टप्प्याटप्प्याने घेऊन फसवणूक केली.
गुंतवणूक केलेली रक्कम परत मागण्यासाठी गेला असता, प्रकाश फाले व सविता फाले यांनी शिवीगाळ करत दमदाटी केली. तर त्यांचा मुलगा यश फाले याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांचे साथीदार शैलेश जगताप याने रिव्हॉल्वरचा धाक दाखवला. जयो जगताप व परवेज जमादार यांनी शिवीगाळ व दमदाटी करुन दिलेली रक्कम परत मागितल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली. ऍड.विजय काळे यांनी तुम्ही तुमच्या पैशाची चिंता करु नका, तुमचे पैसे बुडणार नाहीत अशी हमी देऊन दिशाभूल केली.
तसेच प्रकाश फाले यांच्याबरोबर नेहमी उपस्थित असणारे त्यांचे साक्षीदार रविंद्र बऱ्हाटे, देवेंद्र जैन, विनय मुंदडा, मुकेश पौडवाल, धिरज जाधव यांच्याकडे मागील 4 ते5 वर्षे पैसे मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. यातून माझी खात्री पटली की हे सर्वजन एकाच रॅकेटचे मेंबर आहेत. विविध घटनास्थळी त्यांच्या हालचाली, वर्तन यातून हा आणि इतर गुन्हे करण्याचा त्यांचा सक्रीय सहभाग आहे. या सर्वांनी कट रचून विश्वासघात करुन माझी फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करत आहेत. याप्रकारचे गुन्हे आजवर कोथरुड, समर्थ, खडक, डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. या गुन्हयांमध्ये सर्वाधिक सहभाग हा बऱ्हाटे, जैन, फाले, आणि जगतापचा आहे.