रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित रूग्णाला डिस्चार्ज दिल्यामुळे जिल्ह्यात काही काळ आनंदाचं वातावरण होते. पण, आता जिल्ह्यात आणखी एक रुग्ण आढळल्याने पुन्हा इथे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. साखरतर या गावातील आणखी एका महिलेचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित महिला ही साखरतर येथील कोरोनाबाधित रूग्णाची नातेवाईक आहे.
सध्या या महिलेचे 14 नातेवाईक हे जिल्हा रूग्णालय येथे क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेले आहेत. गुरूवारी ( काल ) दिवसभरात 17 जणांचे रिपोर्ट हे तपासणीकरता पाठवण्यात आले होते. त्यापैकी 15 रिपोर्ट हे मिळाले असून पैकी 1 जण कोरोनाबाधित असल्याचे रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. तर, अद्याप 2 रिपोर्ट हे प्रतिक्षेत आहेत.
साखरतर येथील महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 5 झाली आहे. सध्या एका रूग्णाला सोडण्यात आले आहे तर, खेड येथील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत झालेली व्यक्ति ही दुबई येथून आलेली होती. या प्रकरणाची माहिती लवपल्याप्रकरणी खेड येथील खासगी डॉक्टरवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.