कोल्हापूर : इचलकरंजी येथील नदीवेस परिसरातील एका 70 वर्षीय वृद्ध करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यानंतर प्रशासनाने परिसरात आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत. तसेच संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील चौघांना तपासणीसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इचलकरंजीतील पॉझिटिव्ह संख्या तीनवर पोहचली असून, त्यातील एकजण मरण पावला आहे.
विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण हा महिन्याभरात कोठेही बाहेरगावी प्रवास केल्याचे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे त्याला लागण कशामुळे झाली, याची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्याला उच्च रक्तदाब व फुफ्फुसाचा त्रास आहे. सदर व्यक्तीस 2 मे रोजी पहाटे आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याचा त्रास वाढल्याने त्याला त्याचदिवशी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले होते. रविवारी (दि.3) त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला. याचा सोमवारी दुपारी अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. त्यांच्या शेजारचे एक कुटुंब त्यांच्या संपर्कात आले आहे. त्याचबरोबर संबंधित रुग्ण चार दिवसांपूर्वी सुतार मळा परिसरातील एका दुकानात बसायला जात होता. त्यामुळे त्या दुकानदारासह अन्य संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करण्यात येणार आहे.