पुणे –आर्यन खान प्रकरणातील “एनसीबी’चा पंच किरण गोसावीसह साथीदारांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याचे हे प्रकरण आहे. दरम्यान, गोसावीविरोधात आतापर्यंत फरासखाना, लष्कर, वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी किरण गोसावी (रा. गुरू सिमरन सोसायटी, वाशी रेल्वे स्थानकाजवळ नवी मुंबई), पुणे लष्कर परिसरातील एक महिला, तसेच आणखी एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश वाघमारे (रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी, हडपसर) यांनी यासंदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाघमारे, अनिल पवार, शिवा जमादार यांनी 2018 मध्ये गोसावीची भेट घेतली होती. त्याने परदेशात नोकरीचे आमिष दाखवून गुंतवणूक योजनांची माहिती दिली होती.
त्यानंतर गोसावीची महिला साथीदार मला लष्कर भागात भेटली होती, असे वाघमारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यात गोसावीने 1 लाख 45 हजार रुपये घेतले. त्यानंतर नोकरी मिळवून न दिल्याने पैशांबाबत विचारणा केली. तेव्हा गोसावीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे वाघमारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव तपास करत आहेत.