पुणे – पिंपरी आयुक्तालयाने संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) उद्योगपती नानासाहेब शंकरराव गायकवाड आणि गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड या पिता-पुत्रावर कारवाई केल्यानंतर त्यांच्यावर आता चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात आणखी एक सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गायकवाड पितापुत्रांसह आणि राजु अंकुश याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वप्निल गणपतराव बालवडकर (36, रा. क्लोरीस रेसीडेन्सी, बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालवडकर हे व्यावसायीक असून त्यांचे बुलेटचे शोरूम आहे. त्यांनी व्यावसायासाठी 2016 ते मे 2017 मध्ये 2 कोटी रूपये गायकवाड यांच्याकडून दोन टक्के व्याजाने घेतले होते. तसेच 2017 मध्ये 1 कोटी 4 टक्के व्याजाने घेतले होते. नंतर 2018 मध्ये 55 लाख 4 टक्के व्याजने दिले. तेव्हा त्याने व्याज जर वेळेवर दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली होती.
तसेच फिर्यादी यांनी आरोपींच्या सांगण्यावरून आरोपीचा मित्र धनेश माळी यांच्या खात्यावर 1 कोटी 10 लाख व गायकवाड यांच्या घरी जाऊन 3 कोटी 40 लाख रूपये रोख स्वरूपात दिले होते. यासर्व व्यवहारात गायकवाड यांनी बालवडकर यांची 8 गुंठे जमीन लिहून घेतली. तसेच सावकारी करताना त्यांनी व्याज रोख स्वरूपात घेऊन मुद्दल बँक खात्यावर घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.