पुणे, दि. 28 -महापालिकेने प्रस्तावित केलेला निओ मेट्रो प्रकल्प म्हणजे पुणेकरांच्या डोक्यावर आणून ठेवलेला आणखी एक पांढरा हत्ती आहे, अशी प्रतिक्रिया शहरात उमटू लागली आहे. निओ मेट्रो ही शहरातील प्रमुख रस्त्यांच्या जोड रस्त्यांवरून वर्तुळाकार मार्गाने असणार आहे. त्यामुळे नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी निओ मेट्रोपर्यंत खासगी वाहने आणावीच लागणार आहेत. शहरत दरवर्षी एक ते दीड लाखांनी खासगी वाहने वाढत आहेत. अशा स्थितीत निओ मेट्रोचे योग्य नियोजन न झाल्यास नागरिकांकडून खासगी वाहतुकीलाच प्राधान्य दिले जाईल. त्यातच निओ मेट्रो अनेक भागांत 12 ते 18 मीटरच्या रस्त्यांवर असल्याने त्यांच्या खांबामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीत भर पडेल.
भविष्यात निओ मेट्रो बंद पडल्यास, त्यासाठीच्या मार्गांचा इतर वाहनांसाठी कसलाही वापर करता येणार नाही. अंतर्गत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेस केवळ रस्त्यांचे रुंदीकरण करणे अथवा “एचसीएमटीआर’ रस्ता करणे हा पर्याय होता. मात्र, हे दोन्ही पर्याय सोडून आता निओ मेट्रोचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. 2008 मध्येही अशाच प्रकारे सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी “बीआरटी’चा प्रयोग शहरात करण्यात आला. त्यासाठी आतापर्यंत जवळपास 1 हजार ते 1200 कोटींचा चुराडा झाला असून, शहरात हा प्रकल्प प्रायोगिक स्वरूपात सुरू केलेल्या मार्गावरच आहे. निओ मेट्रोसुद्धा “बीआरटी’प्रमाणे पांढरा हत्ती ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.