मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यातील वादाने काही महिन्यापूर्वी राज्यासह देशाच्या राजकारणात गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, आता समीर वानखेडे यांच्या बदली नंतर त्यांना आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. आता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडेंना दणका दिलाय. समीर वानखेडेंच्या मालकीच्या सद्गुरु बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द केला आहे.
विशेष म्हणजे नवाब मलिक यांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ठाण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी सदगुरु हॉटेल आणि बारला दिलेला परवाना रद्द केला आहे. या हॉटेलचे मालक समीर वानखेडे आहेत. १९९७ साली परवाना काढताना वानखेडे यांनी आपलं वय चुकीचं दाखवल्याचा ठपका ठेवत हा परवाना रद्द करण्यात आला आहे.
समीर वानखेडे यांच्या नावे बार आणि रेस्तराँचा जो परवाना होता ते सद्गुरु बार आणि रेस्तराँ नवी मुंबईमधील वाशी येथे आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार, वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे होता. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच मध्यंतरी हा परवाना रिन्यू करण्यात आला होता.
आता परवाना रद्द केला असला तरी तो ३१ मार्च २०२२ पर्यंतच पात्र होता. म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिने आधीच परवाना रद्द केला असून आता या कारवाईमुळे परवाना रिन्यू करता येणार नाही. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील हा परवाना होता.
मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर वानखेडेंनी यावर स्पष्टीकरण दिले होते. वानखेडे यांनी आपण भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे असल्याचे स्पष्ट केले होते. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आलेत. “यात बेकायदेशीर असे काहीच नाहीय. मी सेवेमध्ये रुजू झालोय तेव्हापासून म्हणजेच २००६ सालापासून या बार आणि रेस्तराँरंटचा उल्लेख माझ्या वर्षीक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख मी संपत्तीच्या हिशोबात मांडलाय. या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख मी प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केलाय,” असे वानखेडे म्हणाले होते. मात्र आता वयाच्या मुद्द्यावरुन हा परवाना रद्द करण्यात आला आहे.