न्यूयॉर्क : फ्रान्समध्ये ७२ तासात दुसरा हल्ला झाला असल्याचे समोर आले आहे. फ्रान्सच्या लायन शहरामध्ये एका ग्रीक परंपरावादी फादरवर चर्चच्या बाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये फादर जखमी झाला असून हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाला आहे. दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले आहे. या हल्ल्यामागील हेतू देखील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
सरकारी वकील नकोलस जैक्वेट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. जेव्हा त्याला अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याजवळ कुठलंही हत्यार नव्हतं.” रॉयटर्सच्या वृत्तानुसार, “स्थानिक प्रमाणवेळेनुसार, संध्याकाळी ४ वाजता फादरवर दोन वेळा गोळीबार करण्यात आला. हा फादर त्यावेळी चर्चच्या आवारातच होता.” तर असोसिएट प्रेसच्या माहितीनुसार, “हल्लेखोरानं हंटिंग रायफलचा वापर केला होता.
घटनेदरम्यान फादरच्या पोटाला जखम झाली त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपाचर सुरु आहेत.” फादरवर हल्ल्याची बातमी कळताच फ्रेंच पोलिसांनी हल्लेखोराला पकडण्याची तयारी सुरु केली.
गेल्या आठवडाभरात फ्रान्समध्ये चर्च जवळ झालेला हा दुसरा हल्ला आहे. काही दिवसांपूर्वी नीस शहरातील चर्चजवळ एका महिलेचं शीर हल्लेखोरानं उडवलं होतं. तर इतर दोन जणांची हत्या केली होती. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी कॅथेड्रल चर्चजवळ घडली होती. तर यापूर्वी १६ ऑक्टोबर रोजी पॅऱिसमध्ये एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता.