पारनेर : अहिल्यानगर – पुणे महामार्गावर सोमवारी रात्री सुपा येथील पवारवाडी जवळ कंटेनर रस्त्यावरच आडवा होऊन झालेल्या अपघातात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले. अपघाताने महामार्गावर वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या आसपास कंटेनर (एमएच १४ सीई २९७८) अहिल्यानगरहून पुण्याच्या दिशेने जात असताना सुपा- पवारवाडी घाट उतार उतरत असताना चालकाने इंधन वाचवण्यासाठी वाहन न्युट्रल करून चालवले.
पुढे पवारवाडी जिल्हा परिषद शाळेच्या वळणावर कंटेनर चालकाला नियंत्रित करता न आल्याने कंटेनर वळणावर वळण घेत असताना पलटी झाला. त्याचवेळी पलटी झालेला कंटेनर एका कारवर आदळला व रस्त्यावर आडवा झाला. या अपघातावेळी कंटेनरमध्ये चार व्यक्ती होते, यात दोघे गंभीर जखमी झाले. पवारवाडीच्या युवकांनी पलटी झालेल्या कंटेनरमधून दोघांना मोठ्या मेहनतीने सुरक्षित बाहेर काढले. सुपा-पवारवाडी येथे कंटेनर पलटी होऊन रस्त्यावर आडवा झाल्याने अहिल्यानगर – पुणे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने पूर्णपणे बंद झाली होती.
त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार वेठेकर, अमोल धामणे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्याअगोदर पवारवाडीच्या युवकांनी वाहनात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढले. सुपा पोलिसांनी व पवारवाडीच्या युवकांनी मोठ्या प्रयत्नांनी हळूहळू वाहतूक कोंडी काढून वाहतूक चालू केली.
या वाहतूक कोंडीत काही व्हीआयपीसह रुग्णवाहिकाही डकल्या होत्या.पवारवाडीचे महेश पवार, संग्राम पवार, राहुल पवार, जय पठारे, नितीन पवार, संदीप पवार, अभिषेक पवार, विजय पवार, महेश गवळी, भूषण पवारसह अनेक युवकांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन हळूहळू वाहतूक चालू करून सर्वप्रथम रुग्णवाहिकांना वाट करुन दिली. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले.