पुणे – ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बाधित व्यक्तीला त्वरीत उपचार मिळावे, त्यासाठी घर ते रूग्णालयाचा प्रवासाठी रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक आरोग्य केंद्रांना 92 रूग्णवाहिका घेण्यास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संमती दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यातील आरोग्य संचालक कार्यालयामध्ये राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी टोपे यांची भेट घेऊन ग्रामपंचायतींनी वित्त आयोगाच्या निधीतून रुग्णवाहिका खरेदी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, जिल्हा परिषदेकडे सध्या उपलब्ध असलेल्या बहुतांश रुग्णवाहिका नादुरुस्त आहेत. ज्या आहेत त्याही रस्त्यात बंद पडण्याची भीती आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळाव्यात, याबाबत प्रस्ताव 2017 पासून राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
कारण, करोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णवाहिकांची कमतरता आहे. सध्या 108 रुग्णवाहिका सेवेवर अवलंबून राहावे लागते. ही सेवा “सी-टाइप’ असून त्यांच्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी तसेच सुविधा हाताळणारे तंत्रज्ञ जिल्हा परिषदेचे उपलब्ध नाहीत, म्हणून “बी-टाइप’ रुग्णवाहिकेची गरज असल्याचे प्रमोद काकडे यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.