पुणे – शहरात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ससूनमध्ये कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील विविध हॉस्पिटलमधील 60 खासगी डॉक्टरांची सेवा अधिगृहित करण्यात आली आहे. आता हे डॉक्टर ससून हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहणार आहेत.
करोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिगृहित करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या 60 डॉक्टरांच्या सेवा अधिगृहित केल्या आहे. यापूर्वी 40 डॉक्टर करोनाविरुद्धच्या युद्धात सहभागी आहेत.
7 दिवसांनंतर होणार विलगीकरण
हे डॉक्टर 7 दिवस ससून रुग्णालयात कार्यरत असणार आहे. त्या नंतर ते राहत असलेल्या हॉटेलमध्येच 7 दिवस विलगीकरण करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय
ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणाऱ्या या रुग्णांना उत्कृष्ट उपचार होण्याच्या दृष्टीने व रुग्णसंख्या वाढल्यास अतिदक्षता कक्षामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासू नये, यासाठी या डॉक्टरांची सेवा घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.