आणखी 4 हजार 518 गावांमध्ये दुष्काळ जाहीर

मुंबई – 151 तालुके आणि 268 महसुली मंडळे तसेच 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या 931 गावांमध्येही दुष्काळ जाहिर केला असतानाच त्यामध्ये आणखी 4 हजार 518 गावांची भर पडली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक 751 त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यातील 731 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये आता जमीन महसूलात सूट, कर्जांचे पुनर्गठन आदी आठ सवलती लागू झाल्या आहेत.

राज्यातील दुष्काळाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अंतीम पैसेवारी 50 पैशांपेक्षाही कमी आलेल्या व अद्याप दुष्काळ घोषित न केलेल्या विविध जिल्ह्यांतील 4 हजार 518 गावांमध्ये राज्य सरकारने दुष्काळसदृश्‍य परिस्थिती जाहीर केली आहे. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांना आता या गावांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना अंमलात आणाव्या लागणार आहेत.

दुष्काळसदृष्य परिस्थिातीमुळे जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात 33.5 टक्‍के सूट, विर्द्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,रोहयोच्या कामांच्या निकषात शिथिलता, आवश्‍यक तिथे टॅंकरने पाणीपुरवठा, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, आदी सवलती या गावांत लागू केल्या जाणार आहेत.

अशी आहेत गावे…
धुळे-50, नंदूरबार 191, अहमदनगर-91, नांदेड – 549, लातूर – 159, पालघर – 203, पुणे – 88, सांगली – 33, अमरावती – 731, अकोला – 261, बुलडाणा – 18, यवतमाळ – 751, वर्धा – 536, भंडारा – 129, गोंदिया – 13, चंद्रपूर – 503, गडचिरोली – 208 अशा 4 हजार 518 गावांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.