- आणखी 832 जणांना लागण; 2468 जणांचे अहवाल प्रलंबित
पिंपरी – करोनाचा कहर दिवसें-दिवस वाढतच आहे. करोनामुळे आणखी 34 रुग्णांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. त्यापैकी 22 हे शहरातील रहिवासी असून 12 हे शहराच्या हद्दीबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेले रुग्ण होते. तसेच दिवसभरात 832 नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. त्यामध्ये 814 शहरातील नागरिक असून 18 शहराबाहेरील आहेत. गेल्या दोन दिवसांपासून एकूण करोनाबाधितांचा आकडा एक हजाराच्या खाली आला असला तरी अहवाल प्रतिक्षेत असलेल्या संशयितांची संख्या 2468 इतकी आहे.
सोमवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (मंगळवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 814 जणांना तर शहराबाहेरील 18 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर 22 शहरातील असून 12 शहराबाहेरील रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1175 वर पोहोचला असून शहराबाहेरील 365 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 1572 ची संख्या आज गाठली.
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील चिंचवड, भोसरी, पिंपरी, तळवडे, सांगवी, ताथवडे, पिंपळे निलख, आकुर्डी, मोशी, निगडी, प्राधिकरण आणि रुपीनगर येथील 22 जणांचा समावेश आहे. तर चाकण, धनकवडी, वारजे, मंचर, लोणावळा, वडगाव, इंदुरी, जुन्नर, आंबेगाव व सातारा येथील 12 जणांचा समावेश आहे.
आतापर्यंत शहरातील 57 हजार 914 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 4054 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 905 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 2468 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेले 3106 जण महापालिकेच्या विविध रुग्णांलयांमध्ये दाखल झाले आहेत. तर शहरातील 5188 आणि शहराबाहेरील 1136 जणांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.