पिंपरी – शहरातील 25 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 6 अशा एकूण आणखी 31 जणांना “करोना’ची लागण झाली आहे. बुधवारी दुपारी साडे चार वाजता हाती आलेल्या महापालिकेच्या अहवालानुसार शहरातील 15 पुरुष आणि 10 स्त्रियांना “करोना’ची लागण झाली आहे. यामुळे शहरातील एकूण “करोनाबाधितां’चा आकडा 584 वर जाऊन पोहचला आहे. तसेच शहराच्या हद्दीबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या एका “करोनाबाधिता’चा बुधवारी मृत्यू झाला आहे. यामुळे शहराबाहेरील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 15 पर्यंत जाऊन पोहचला आहे.
बुधवारी देहूरोड येथील एका 70 वर्षीय रुग्णाचा “करोना’मुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण हे शहरातील आनंदनगर झोपडपट्टी, वाकड, दापोडी, रामनगर, चिंचवड, पिंपरी, अजंठानगर, किवळे, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, मोरवाडी या भागातील आहेत. तसेच शहराबाहेरील रुग्ण हे खडकी, कसबा पेठ, बालेवाडी व औंध येथील रहिवासी आहेत.
बुधवारी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये एकूण 103 संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. तर एकूण 189 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तसेच रुग्णालयात 285 रुग्ण दाखल आहेत. आजपर्यंत महापालिकेने एकूण 6261 रुग्णांचे “स्वॅब’ तपासणीसाठी पाठविले आहेत.
“करोनामुक्तां’चा आकडा तीनशे पार
एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे बरे होत असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे प्रमाणही वाढले आहे. बुधवारी वाकड, चिंचवड, रहाटणी, फुगेवाडी, पिंपळे सौदागर, रावेत, वाल्हेकरवाडी, आनंदनगर, ताथवडे व बीड येथील रहिवासी असलेल्या 26 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत एकूण 319 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.